स्वप्न जेव्हा सत्यात येते मन तेव्हा प्रश्न करते मग सुख नेमके कशात होते ? -------------------------------------- प्रत्याक्षाहुन प्रतिमा नेहमीच उत्कट सत्य नाही स्वप्नंच मिळतात फुकट! -------------------------------------- एका दीन-दुबळ्या देशी सारेच आहेत सुखी कारण काय बरं ते? साऱ्यांकडे स्वप्नांची उशी -------------------------------------- स्वप्नं विकून ते गरिबांना सत्यात पैसे कमावतात नकळत फसून गरीबच श्रीमंतांना अधिक श्रीमंत करतात -------------------------------------- स्वप्नं दाखवूनच ते राज्य करतात सामन्यांना लूट लूटतात आणि तीच अपूर्ण स्वप्नं घेऊन पुन्हा सत्तेत येतात
-------------------------------------- रंगीबेरंगी स्वप्नांचा पूर मृगजळच ते! खूप दूर वेडया आशांचे आरसे लखलखतात अजून
--------------------------------------
आभाळी तारे असताना तू जवळ नसताना मन पिसे होताना आणि आठवणीत रमताना विसरलेली गाणी अशी साद घालतात...... परत त्या चंदेरी दुनियेत नेतात भावस्वप्ने उलगडतात आणि पाकळ्या होऊन विसकटतात....
शब्दातीत युगपुरुष तू
शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
या पावन भूमीचा राजा की आत्म्याचा ईश्वर
समरांगणी पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
अखिल जगी तुझे उदात्त राज्य
साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र
आजही गहीवरे प्रत्येक माता
कधी लाभेल मुक्तीचे पुण्य
अन् पुत्र तुजसम त्राता
गोठलेले अश्रु आज वितळले
सुन्न किनारी फिरताना मला बिलगले
खूप काही सांगू लागले,
म्हणाले,
अश्रुंचीही एक भाषा असते त्या पैलतीरी जाताना ती ऐकू येते असे किनारे ओलांडताना ..... नवी क्षितिजे पाहताना ...
झुरताना... कष्टताना.... सुदूर धेय्याची स्वप्ने पाहताना .... ती खूप काही शिकवून जाते अश्रुंचीही एक भाषा असते....
धूसर होणाऱ्या पायवाटा
आणि घननीळ समुद्राचा आगाज
त्या नीरव शांततेत
तुझ्या आठवाने कंपित होणारे हृदय.....
त्या घननादाच्या दिशेने माझे अकल्पित जाणे
तुझ्या-मुळच विदीर्ण झालेल्या मनाचे पुन्हा तुझ्याच ओढीने अधीर होणे .... हे मात्रुभूमी, तुझा जिव्हारी लागत जाणारा विरह सहन होत नाही....