पुन्हा

इंद्रधनुचे रंग आज नवखे वाटले 
इतके सुरेख ते कधीच नाही दिसले 
आकाश असे निळे निळे पाहताना 
मन खुले 
एक एक थेंब हि मग बरसताना
वाटे आपलासा 
कवितेच्या वहिवरची मी पाने उलटली 
भावनांनी ओथंबलेली 
किती दिवस मन काही बोलत कसे नव्हते? 
तराणी जुनीच आळवत  होते?
त्या नव्या पाना-फुलांनी सजलेले रोपटे 
काहीच कसे डोलत नव्हते?
आज मात्र पावसाचे एक गाणेच ऐकू येत होते 
कवितेच्या वहीचे एक नवीन पान
पुन्हा भावनांनी भरत होते!


मोरपंखी क्षितिजावर

मोरपंखी  क्षितिजावर  आज  एक  वेगळीच  लाली
जुन्या  आठवणींची  त्यास  अबोध  खोली
मन  भटका  वाटसरू  एखादा
उन्हात  अवेळी  फिरणारा
कविता  त्याची  अगोड  शिदोरी  निकडीची
पाखराचा तो  जीवघेणा चित्कार
भेसूर  कसा  तो  वाटेना
मनाचे  नेहमीचेच हे असे  रडे
वेगळे काय त्यात?

बोच  छळणारी कुठलीतरी
संपलेल्या  वाटेवर  आशेची  कांडी पुन:  पुन्हा  फिरणारी
नभ  असे  नवीन  का  भासत  नाहीत  कधीच
कि  मीच  ते  नाविन्य  शोधू  शकत  नाही?
काय  हे,  पुन्हा  आला  तो
पाऊस  नवी  कहाणी  घेऊन
तीच  नवी आशा  आणि  नवी  तराणी घेऊन
मन  भटका  वाटसरू  गेला  गोंधळून  
पाहतो  पुन्हा  फुटतात  का  ते  पोपटी  धुमारे म्हणून

स्वप्नंच ते रेशमी

आतुर संध्याकाळी
परीकथेतील  राजकुमाराचे स्वप्न मनी

सुंदरशा  मरुद्यानी
उमललेली ती  गुलाबी कळी

स्वप्नी दिसली
इंद्रधनुचे  छत असलेली पर्णकुटी

शुभ्र अश्वावरी स्वार
तो वीर निनावी

नील आभाळी
शुभ्र ढगांची दुलई

पाहू कसे मुख कमल त्याचे
स्वप्नंच ते रेशमी



हे नीलकंठा

त्रिनेत्री  ज्वाळा रुद्राक्ष गळा 
हे नीलकंठा, उमावेल्हाळा

करी प्राशन हे दु: ख हलाहल
अर्पण तुला बेल, सफेद ते फूल

मी कलाकर य: किंचित
हे नटराजा ठेव तुझा वरदहस्त

या मनीची अथांग गुंतागुंत
तूच एक करी मुक्त

नमन तुज विनयेन
तुझे पायी ठेवीन डोई
भक्त तुझा मी शोभेन

हे नीलकंठा,
आणि काय मागू आता

भोळ्या भक्ताचा तूच दाता, त्राता!



सुकली पाने गोळा करताना

सुकली पाने गोळा करताना
मन हळवे झाले

चाकोरीचे तेच ठसे
पुन्हा गडद झाले

ढगांच्या चंदेरी काठावर
जुने स्वप्न हसले

तेच नित्याचे गाणे
जात्या वरती रुळले

नव्या रंगाची आस आणि
नवे जग कथा बनुन राहिले

नव्या आशंच्या हिंदोळ्यावर
पुन्हा झुलायचे ठरले

सुकली पाने गोळा करताना
मन पुन्हा हळवे झाले


कागदाचं एक पान