जुन्या अगम्य वाटा

आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा
भावनांच्या पानावर
निशब्द कविता

हळव्या मायभूमीवर
आशांचा कोसळता मनोरा

अथांग सागरावर
भयाण लाटा

का दिसतात आठवणींच्या काळोखात
जुन्या अगम्य वाटा?

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण

अश्विन सरताना पावन भूमीवर उजळतो दिप 
तेजोमय दश-दिशा अन् प्रफुल्लित  मनं

मंगल दिनी या शिवप्रभुंचे स्मरण
प्रदिप्त समशेर अन् विक्राळ दैत्यांचे खंडण

अश्वमेध तो स्वराज्याचा अजिंक्य
इतिहासाचे सोनेरी पान वीररसाने तप्त

अंगणी सजतो लघु दुर्ग तो मनमोहक
तट, बुरुज स्मरतो प्रौढ प्रताप पुरंदर

कृपाच अशी आमुच्या दिव्य राजाची अपार
आनंदाचे हे अथांग ऋण वदतो आम्ही पामर

अभिमानी आम्ही या  थोर राज्याचे बालक
त्या तेजोदिप्त निष्णात  तलवारीचे ऋणी अन् शिवबाचे साधक



स्वप्नांविषयी थोड़ेसे

स्वप्न जेव्हा सत्यात येते
मन तेव्हा प्रश्न करते
मग सुख नेमके
कशात होते ?
--------------------------------------
प्रत्याक्षाहुन प्रतिमा
नेहमीच उत्कट
सत्य नाही
स्वप्नंच मिळतात फुकट!
--------------------------------------
एका  दीन-दुबळ्या  देशी
सारेच आहेत सुखी
कारण काय बरं ते?
साऱ्यांकडे स्वप्नांची उशी
--------------------------------------
स्वप्नं विकून ते गरिबांना
सत्यात पैसे कमावतात
नकळत फसून गरीबच श्रीमंतांना
अधिक श्रीमंत करतात
--------------------------------------
स्वप्नं दाखवूनच ते राज्य करतात
सामन्यांना लूट लूटतात
आणि तीच अपूर्ण स्वप्नं घेऊन
पुन्हा सत्तेत येतात
--------------------------------------
रंगीबेरंगी स्वप्नांचा पूर
मृगजळच ते! खूप दूर
वेडया आशांचे आरसे
लखलखतात अजून
--------------------------------------

शब्द तेव्हा धावत येतात

मावळतीच्या गडद छटा
जेव्हा उदास वाटतात
पानांची सळसळ
संथ तराणे होते
क्षितिजावरच्या रेषा
जेव्हा धुसर होतात
शब्द तेव्हा धावत येतात...
आणि अनोखे भाव उलडगतात

माझी झाली चारोळी

अतिशय  कमी शब्दांतून  मार्मिक अर्थ व्यक्त करणारी चारोळी मला नेहमीच भुरळ  घालत आली आहे...ती लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.

१) माझ्या देशात लोक स्वप्नं जाळतात
त्यावर दु:खाची पोळी भाजतात
आणि पोट भरलं म्हणून
सुखाने झोपतात

२) अवती भवती हिरवळ
पानांची सुमधुर सळसळ
सूर्याचा पहिला किरण
हे स्वप्नच का केवळ ?

३) कित्येक स्वप्नांचा चुरा
इथे रोज होतो
तरीही नव्या आशांचा मनोरा
आम्ही रोज रचतो

४) चार चार ओळी लिहीताना
माझी झाली चारोळी
व्यक्त काही झाले की नाही
मी तोडली चाकोरी 

तू दूर कुठे ?

नील आभाळ आणि
लुकलुकते  तारे
मला साद  घालती सारे
तू  दूर  कुठे ?

स्वप्नातले गीत  आणि
सुखाचे फसवे मनोरे
त्या लाटा  अन्  ते किनारे
तू  दूर  कुठे ?

वाट पाहून  शिणले   डोळे
तू  दूर  कुठे ?

अबोली मिटताना

संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले
पहाटे दवबिंदु पाहताना
साद घालू लागले
पाना-पानांत फूल हसले
केशरी किरणात न्हाऊन निघाले
संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले...

कागदाचं एक पान