प्रश्नपत्रिका

आयुष्य नावाची प्रश्नपत्रिका
आपल्या सगळ्यांनाच मिळलीये,
काही सोपे काही अगम्य, काही अवघड, काही फसवे, काही मोठे असे प्रश्न घेऊन!

प्रश्न तर सोडवायचेत सगळे, उत्तरं मात्र माहीत नाहीत,
परिणामांचे विचार मनात फेर धरून नाचतायेत,
पण आयुष्य नावाची एक सुंदर संधी आहे,
या प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी

नियती आणि प्रारब्ध सततच घेत आहेत परीक्षा
एक प्रश्नपत्रिका सोडवेपर्यंत दुसरी हजर!
पण या प्रश्नामधले सौंदर्य पाहिले का आपण कधी? 
काही कविता आहेत, काही शब्द आहेत, काही स्पष्टीकरणे, तर काही गोष्टी आहेत..
प्रश्न आहेत, पण ते सुंदर आहेत,
काही रुसलेली नाती असतात ना तसे!

निराशेचा खेळ संपवून, 
प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, नव्या उमेदीने
भिडायचे आहे या प्रश्नांना!

नियती देईल कदाचित निराशा परत
पण आशेने उचलली धारदार तलवार पाहून
ती ही थबकेल काही क्षण
हेच काही मौल्यवान क्षण आपले 
आहेत, जिंकण्याची संधी देणारे

शस्त्रे खाली ठेवून प्रश्न सोडून देण्यापेक्षा
शस्त्रे परजून लढण्याची उमेद देणारी माणसं आहेत की आसपास उभी,
अखंड प्रेरणेचा झरा घेऊन!
कोणी नसलेंच कधी
तर आपणच बनुया हे झरे इतरांसाठी!

निवड आपल्याला करायचीये
दुःख निवडायचे की सुख,
ते आपण ठरवायचेय
नियती, परिस्थिती, आणि प्रारब्धाच्या बाहुल्या असलेली माणसे - यांना दोष देत
निरस जगायचे की,
नियतीच्या प्रत्येक प्रश्नास 
आनंदाने उत्तर द्यायचे
निखळ आनंदाचे झरे शोधायचे
किंबहुना हे झरे निर्माण करायचे
हे आपणच ठरवायचे आहे

प्रश्नपत्रिका मिळलीये, पण त्यासोबतच संधी देखील मिळलीये
आपल्या सगळ्यांनाच
पण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी आहे,
ती कशी सोडवायची हे प्रत्येकाने ठरवायचेय!
नियती लाख दुःखें देईल, पण सुखाची निवड करायची संधी देखील चोर पावलाने येईल
आपण फक्त दार उघडायचे आहे
दुर्दम्य आशेची किल्ली घेऊन
लख्ख उजेडाचे स्वागत कराचे आहे
मन निरभ्र ठेऊन! 

0 Comments:

Post a Comment

कागदाचं एक पान