अबोली मिटताना

संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले
पहाटे दवबिंदु पाहताना
साद घालू लागले
पाना-पानांत फूल हसले
केशरी किरणात न्हाऊन निघाले
संध्याकाळी अबोली मिटताना
तुझे अबोल गीत बरसले...

भूमीपुत्राची व्यथा

काळ्या ढगाची कृपा कधी होणार?
कोरडया डोळ्यातली आस
देवा तुला कधी कळणार?

पेटत्या निखाऱ्यावर चालणारी  ती पावलं
रडवेली पोरं
अन्  राब-राबून थकलेल्या हातांची वेदना
देवा तुला कधी कळणार?

भूमीपुत्राची ही दशा 
धगधगत्या वास्तवात जळणारी त्याची आशा
या शेतात पालवी कधी फुटणार
रानात केलेलं  रक्ताचं  पाणी
देवा तुला कधी दिसणार?

भुकेचा वणवा तर अन्नदात्याच्याच पोटात
काय देवा तुझा  न्याय काही जात्यात तर काही सुपात!

तळमळ

ते  अस्थिर किनारे 
उमलून पडलेले शिंपले
आणि तरफ सूने सूने
 
चंचल लाटा
अधीर समुद्रपक्षी
आणि ओथंबलेलं  आभाळ

हळव्या मनाचे मौन
आणि आनंदाचे मृगजळ

तू नसताना होते ती हीच का
मनाची तळमळ?

विसरलेली गाणी

आभाळी तारे  असताना
तू जवळ नसताना
मन पिसे होताना
आणि आठवणीत  रमताना
विसरलेली गाणी
अशी साद घालतात......
परत त्या चंदेरी दुनियेत नेतात
भावस्वप्ने उलगडतात आणि
पाकळ्या होऊन विसकटतात....

शिवतेज

शब्दातीत  युगपुरुष तू
शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
या पावन भूमीचा राजा की  आत्म्याचा ईश्वर

समरांगणी  पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली

वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
अखिल जगी तुझे उदात्त राज्य
साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र

आजही गहीवरे प्रत्येक माता
कधी लाभेल  मुक्तीचे पुण्य 
अन् पुत्र तुजसम त्राता

निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी

- अनुजा खैरे

होळीच्या शुभेच्छा!!

उजळलेले  क्षण
रंगांनी  मोहरुन जावे,
सुखाची उधळण व्हावी
आणि मन त्यात हरखुन जावे.....

खूप काही सांगायचे राहुन गेले

तुझ्या डोळ्यातले अश्रु
माझे झाले
खूप काही सांगायचे राहुन गेले

गहिवरलेले शब्द तिथेच थिजले
व्यक्त करायचे राहुन गेले

तुला पाहताना
फक्त अश्रुच बोलले
मन मोकळ करायचे राहुनच गेले

तुझ्या शब्दांनी भरुन आलेले
कळतील का कधी तुला
माझे अव्यक्त भाव
जे तुला सांगायचे राहुन गेले

कागदाचं एक पान