मिट्ट काळोखातून डोकावत
चंद्र म्हणाला
पहा ना पुन्हा एकदा पत्र लिहून
अजून कित्येक पत्रांचं उत्तर आलेलं नाहीये
पण पाहू पुन्हा एकदा साद घालून
मी म्हणाले - बरं तू म्हणशील तसं
शांत क्षितिजावर पहुडलेलं
इंद्रधनु म्हणालं
भर ना गहिरे रंग शब्दांत
अजून त्याला शब्द नाही भावले
पण पाहू पुन्हा एकदा मनं जोडुन
मी म्हणाले - बरं तू म्हणशील तसं
फुलांच्या गर्दीत हरवलेली
इवली अबोली म्हणाली
बोल ना, बोलत का नाहीस?
अजून तुझ्या मनातलं तो समजू शकला नाही
पण पाहू पुन्हा एकदा बोलून
मी म्हणाले - बरं तू म्हणशील तसं
भावविभोर नेत्रातला
अश्रू म्हणाला
कर ना व्यक्त भाव सारे
अजून तुझ्या भावनांचा कल्लोळ त्याला नाही कळला
पण पाहू पुन्हा एकदा कविता लिहुन
मी म्हणाले - बरं तू म्हणशील तसं
चंद्र, इंद्रधनु, अबोली, अश्रू साऱ्यांचं ऐकलं
साऱ्यांना म्हणाले तू म्हणशील तसं
तुलाही म्हणाले तू म्हणशील तसं
पण तू केव्हा म्हणणारेस
अगदी तू म्हणशील तसं?
- अनुजा खैरे